सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे, पुस्तकं झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे: राज ठाकरे
 जिल्हा

अधिवेशनाच्या प्रारंभी अजित पवारांना श्रद्धांजली; शोकप्रस्तावावर सर्वपक्षीय नेत्यांची मनोगते, उद्धव ठाकरे उपस्थित

डिजिटल पुणे    23-02-2026 11:57:54

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज (२३ फेब्रुवारी) मुंबईतील विधानभवनात होत असून पहिल्याच दिवशी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना दोन्ही सभागृहांत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. विधानसभेत त्यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडण्यात येणार असून वातावरण भावूक होण्याची शक्यता आहे.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा आराखडा निश्चित करण्यात आला असून हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च २०२६ रोजी सादर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शोकप्रस्तावावर सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे

परंपरेनुसार विधानसभा अध्यक्ष शोकप्रस्ताव मांडून तो सभागृहात वाचून दाखवतील. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याबाबत मनोगत व्यक्त करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे.मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य आपली भावना व्यक्त करतील, अशी माहिती आहे.

उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख  उद्धव ठाकरे हे देखील आज सभागृहात उपस्थित राहणार आहेत. शोकप्रस्तावाच्या वेळी ते विधान परिषदेत हजर राहतील. ते भाषण करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अपघाताची पार्श्वभूमी

२८ जानेवारी रोजी बारामतीकडे प्रचारासाठी जात असताना अजित पवार यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर झालेल्या स्फोटात त्यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला होता.

अपघाताबाबत संशयाची चर्चा

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विमानातील इंधनाच्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच वैमानिकाच्या कृतीबाबतही शंका उपस्थित करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर आजच्या अधिवेशनाच्या प्रारंभी होणाऱ्या शोकप्रस्तावाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती