मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत अजित पवार यांना दोन्ही सभागृहांत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी अजितदादांसोबतच्या आठवणी सांगताना भावूक झाल्याचे दिसून आले.चित्रा वाघ म्हणाल्या की, गेली तीन दशके त्यांना अजितदादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. कार्यकर्त्यांवर अपार प्रेम करणारा आणि कुटुंबप्रमुखाप्रमाणे सर्वांना सांभाळणारा नेता म्हणून त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख केला. यवतमाळ ते नागपूर दरम्यान काढलेल्या पायी मोर्च्याचा उल्लेख करत त्यांनी दादांच्या नेतृत्वशैलीची आठवण करून दिली.
राष्ट्रवादी सोडतानाचा प्रसंग
27 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. त्यावेळी अजितदादांचा स्वतःचा फोन आल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. “तुमच्यासोबत जे घडलं त्याची मला कल्पना आहे; त्या वेळी मी काही करू शकलो नाही,” असे दादांनी सांगितल्याची आठवण त्यांनी व्यक्त केली. पुढे आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का, तसेच आपण देवेंद्र फडणवीस यांच्या थेट संपर्कात आहात का, अशी विचारपूसही दादांनी केली होती. त्यानंतर त्यांनी शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी विश्वास व्यक्त केला, असे वाघ यांनी सांगितले.
वाढदिवसाचा फोन राहिलाच
अलिकडेच अजितदादांच्या कार्यालयातून वाढदिवसाच्या तारखेची खातरजमा करण्यासाठी फोन आल्याचेही त्यांनी नमूद केले. “16 तारखेला दादा स्वतः फोन करणार आहेत,” असे सांगण्यात आले होते. मात्र ती तारीख उलटून गेली, पण दादांचा फोन आला नाही, असे सांगताना त्या भावूक झाल्या.
सुनेत्रा पवारांविषयीही उल्लेख
यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत, कठीण परिस्थितीत त्यांनी जबाबदारी स्वीकारल्याचे कौतुक केले. तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना बहिणीप्रमाणे साथ दिल्याचेही त्या म्हणाल्या.अधिवेशनाच्या सुरुवातीलाच व्यक्त झालेल्या या भावना सभागृहात उपस्थित सदस्यांना भावूक करून गेल्या.