पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी ,पुणे. मराठी विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० फेब्रुवारी व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयात "विविध साहित्यप्रकारातील लेखन कौशल्ये" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत २० फेब्रुवारी रोजी प्रा.डॉ.नवनाथ तुपे यांचे 'सर्जनशील लेखन आणि अर्थ निर्णयन 'आणि प्रा. सुशील धसकटे यांचे' कादंबरी साहित्यप्रकारातील लेखन कौशल्ये' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. अपर्णा पांडे यांनी सांगितली यामध्ये त्यांनी कार्यशाळेसाठी निवडलेला विषय विद्यार्थ्यांसाठी कसा उपयुक्त आहे, तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मराठीसाठी प्रात्यक्षिके नेमलेली आहेत त्यासाठी कसा उपयुक्त आहे व लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून कसे मार्गदर्शन मिळणार आहे याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थी विकास मंडळाचे विविध उपक्रम सांगून महाविद्यालयात ते कशाप्रकारे राबवले जातात याची माहिती दिली, तसेच या कार्यशाळेमागील हेतू स्पष्ट केला.
पाहुण्यांचा परिचय आदेश गायसमुद्रे व गायत्री कोळेकर हिने करून दिला. आपल्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. नवनाथ तुपे यांनी सर्जनशील लेखन म्हणजे काय हे स्पष्ट करत लेखनासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे सांगितले. लेखनातील विविध टप्पे स्पष्ट करत अर्थनिर्णयन कसे केले जाते हे सांगितले. कोणत्याही लेखनामागे हेतू हा महत्त्वाचा असतो हेतू शिवाय लेखन होऊच शकत नाही असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना काही शब्द देऊन यातून नवीन शब्द कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक त्यांनी दिले.
प्रा. सुशील धसकटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून लेखन करत असताना गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत. जीवनात घेतलेले वेगवेगळे अनुभव यातून एक सुसूत्र साखळी तयार करता आली पाहिजे असे सांगितले. लेखन एक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी अनेकदा बराच काळ जावा लागतो त्यांनी आपल्या 'जोहार' या कादंबरी लेखनामागील प्रेरणा, लेखन प्रक्रिया उलगडून दाखवली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य व व्यवस्थापन समिती सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रा. डॉ.संगीता जगताप होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अशा उपक्रमांचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात असलेले महत्त्व स्पष्ट केले महाविद्यालयातील सर्व विभाग विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात याबद्दल कौतुक केले. तसेच दोन्ही वक्त्यांनी मांडलेले विचार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आणावेत असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अपेक्षा नाकतोडे तर आभार प्रदर्शन डॉ. मनीषा खैरे यांनी केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रा. डॉ. कीर्ती मुळीक यांचे 'कथा साहित्यप्रकारातील लेखन कौशल्ये' या विषयावर तर नीलिमा फाटक यांचे 'काव्य साहित्यप्रकारातील लेखन कौशल्ये' या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यशाळेच्या समन्वयक प्रा.अपर्णा पांडे यांनी विद्यार्थ्यांमधील काव्य व कथा लेखनाच्या आवडी विषयी सांगून आजच्या कार्यशाळेमधून त्यांच्या लेखनाला कशी दिशा मिळणार आहे याविषयी सांगितले,तसेच मुलांच्या लेखन कौशल्यात होणारी सुधारणा हेच या कार्यशाळेचे फलित आहे हे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी विकास मंडळ महाविद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली. आपल्या मार्गदर्शनात प्रा.डॉ. कीर्ती मुळीक यांनी कथालेखनाचे बीज मनात कसे पडते व हळूहळू रुजत जाऊन त्यातून कथा कशी जन्माला येते हे स्पष्ट केले. कथेतील विविध घटकांचे विश्लेषण करून आपल्याला आलेला अनुभव त्या चौकटीमध्ये कसा सामावला जातो याविषयी सांगितले. आपल्या 'वर्तमान' या कथासंग्रहाच्या मागची निर्मिती प्रक्रिया ही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. सौ. नीलिमा फाटक यांनी कविता म्हणजे काय? ती कशी स्फुरते कवितेमधील प्रतिमा, अलंकार, रूपक याविषयी सांगत कवितेच्या अनेक प्रकारांची माहिती दिली.
कवितेतील विविध प्रवाह त्यांनी स्पष्ट केले विद्यार्थ्यांना काही शब्द देऊन, काही कल्पना देऊन कविता करण्यास प्रोत्साहन दिले, त्यापैकी कादंबरी कुडचिकर या विद्यार्थिनीला व आदिनाथ कोळेकर या विद्यार्थ्यास उत्तम कविता सादर केल्याबद्दल त्यांनी पुस्तक भेट दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य व व्यवस्थापन समिती सदस्य प्रा डॉ. संगीता जगताप यांनी कविता सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी असेच उपक्रमशील राहावे. महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा निश्चित फायदा करून घ्यावा असे सांगितले. याप्रसंगी पाहुण्यांची ओळख नीलिमा कराळे व निकिता कसबे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय फटांगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शर्मिला देवकाते यांनी केले.
दोन दिवसीय कार्यशाळेत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. प्रणित पावले यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील विभाग प्रमुख तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. डॉ.जितेंद्र वडशिंगकर, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. भरत राठोड, डॉ. क्रांती बोरावके, डॉ. अनंत पवार, डॉ. ज्ञानेश्वर जांभुळकर, डॉ. सुभाष वाव्हळ, डॉ. नागेश भंडारी, डॉ.अमृता इनामदार, प्रा.प्रीती जोशी, गुंजन गरुड, डॉ. मनीषा त्र्यंबके, प्रा.सद्दाम घाटिवाले, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. प्रणाली शितोळे, प्रा. विद्या पालवे, प्रा. प्राजक्ता कुंभार, डॉ. सुनील वाघ, अक्षय कामटे, डॉ. रश्मी भुयान, प्रा. नेहा बवले, प्रा. गायत्री पवार, तेजस्विनी नायकवडी, प्रा.शैलेश सुरोशे, प्रा.अथर्व गायकवाड, श्री. रवी लाड आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मा. प्रा. डॉ .संगीता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अपर्णा पांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहाय्य मिळाले. या कार्यशाळेत कला, वाणिज्य, विज्ञान ,संगणक, बीबीए ,बीसीए, फॅशन टेक्नॉलॉजी ,ब्युटी थेरेपी अशा विविध शाखातील ८०विद्यार्थी उपस्थित होते.