पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान धक्कादायक घटना घडली. कारवाईची माहिती मिळताच एका महिला कर्मचाऱ्याने आणि स्पा व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारल्याचे समोर आले आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास विमाननगर पोलिस ठाण्याच्या पथकाने संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकला. या ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. कारवाईदरम्यान अटकेच्या भीतीने महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने उडी मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
उडी मारल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे महिलेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी स्पा सेंटरमधील कागदपत्रे, परवाने, कर्मचारी नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणी व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.