सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं
  • विमाननगरातील स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक जखमी
  • पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 क्राईम

पुण्यात काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला; तुषार दामगुडेंची रिव्हॉल्व्हर जप्त, नोटीस देऊन मुक्तता

डिजिटल पुणे    24-02-2026 12:30:17

पुणे : काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर सोमवारी (२३ तारखेला) सायंकाळी मित्रमंडळ चौक परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दामगुडे यांच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्व्हर जप्त केली असून त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवार आणि दामगुडे हे दोघेही एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दामगुडे आधी बाहेर पडले. काही वेळाने पवार फोनवर बोलत बाहेर येत असताना मित्रमंडळ चौकाजवळ दामगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना थांबवले. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला; मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीमध्ये झाले, असा आरोप पवार यांनी केला आहे.

पवार यांच्या म्हणण्यानुसार, दामगुडे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्यांनी जवळील कार्यालयाच्या सुरक्षारक्षकांकडे धाव घेतली. दरम्यान, दामगुडे आणि त्यांचे सहकारी दुचाकीवरून निघून गेल्याचे सांगितले जाते.

घटनेनंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. “परवानाधारक शस्त्र स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे की इतरांना धमकावण्यासाठी, याची चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कारवाईबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अपेक्षित आहे.


 Give Feedback



 जाहिराती