नालासोपारा : नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात सख्ख्या भावाने विवाहित बहिणीवर हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या आईवरही त्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीतील साईधाम वेल्फेअर चाळीत सुप्रिया कानडे (वय ३५) या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्यांची आई आणि भाऊ शेजारीच वास्तव्यास आहेत. घटनेच्या वेळी सुप्रिया यांचे पती गावी गेले होते.हल्ल्यात सुप्रिया गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून मध्ये पडलेल्या आईवरही आरोपीने वार केले. जखमी आईला तातडीने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आज पहाटे सुप्रिया आणि त्यांचा भाऊ अजित मालुष्टे (वय ४०) यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात अजितने धारदार शस्त्राने बहिणीवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी झालेल्या सुप्रिया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आईने हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही हल्ला करण्यात आला. जखमी आईला तातडीने पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी अजित याच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.वसई-विरार परिसरात अल्पावधीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.दरम्यान, वसई-विरार शहर परिसरात गेल्या आठवड्यातील ही चौथी हत्या असल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.