पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या अनुदानातून “निर्भय कन्या : सेल्फ डिफेन्स कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींना प्रत्यक्ष स्वसंरक्षण कौशल्ये आत्मसात करून देणे, त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत सजगता निर्माण करणे हा होता.
प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना स्वसंरक्षण ही केवळ एक कला नसून धैर्य, जागरूकता आणि आत्मविश्वासाची जीवनदृष्टी आहे, असे प्रतिपादन केले. बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक युगात शैक्षणिक प्रगतीसोबत मानसिक आणि शारीरिक सज्जताही तितकीच आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यशाळेतील तज्ज्ञ सत्र आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण स्कूल ऑफ मार्शल आर्ट, पुणेचे अध्यक्ष श्री. विकास बडधे यांनी चार महिला प्रशिक्षकांसह दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना मूलभूत स्वसंरक्षण तंत्र, संकटातून सुटण्याच्या उपाययोजना आणि परिस्थितीजन्य जागरूकता यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत विविध तंत्रांचा सराव केला आणि आपत्कालीन परिस्थितीत आत्मविश्वासाने कसे वागावे याचे मौल्यवान धडे आत्मसात केले.
संपूर्ण कार्यशाळेचे यशस्वी समन्वयन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. कल्याणी चौधरी यांनी केले. त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार व डॉ. महारुद्र कपसे उपस्थित होते.मुक्त संवाद आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘निर्भय कन्या’ हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला असून सजग, सक्षम आणि आत्मविश्वासू नागरिक घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
