डोंबिवली (ठाणे): शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी वैयक्तिक आयुष्यातील तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांना तातडीने उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेचा तपास विष्णूनगर पोलीस ठाणे करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर विवाहित असून डोंबिवलीत त्यांचे स्वतःचे सुसज्ज रुग्णालय आहे. काही महिन्यांपासून त्यांचे रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेशी जवळीक वाढली होती. या संबंधांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद वाढल्याचे सांगितले जाते. परिस्थिती चिघळल्यानंतर त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, परिचारिकेकडून विवाहाचा आग्रह धरला जात असल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. डॉक्टरांनी वैवाहिक स्थितीमुळे दुसरे लग्न शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर संवाद बंद झाल्याचे समजते. यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित डॉक्टरांनी आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात मद्यसेवन करून औषधांचे अति सेवन केल्याचा प्रकार उघड झाला. वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता ते अचेत अवस्थेत आढळले. तातडीने उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत असून नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.