उरण : भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही उरण तालुक्यात आजही अत्याधुनिक व सुसज्ज असे एकही हॉस्पिटल नसल्याने जनतेला आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे उरण तालुक्यात अत्याधुनिक सेवा सुविधा सह एकही सुसज्ज हॉस्पिटल नाही. तर दुसरीकडे इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय हे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा सुविधा मिळत नसल्याने उरणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.उरण शहरात महिन्याला ३५० पेक्षा अधिक श्वानदंश होण्याच्या घटना घडत आहेत. मात्र त्यासाठी लागणारे 'अँटी रेबीज' औषधांचा साठा अपुरा असल्याने आठवड्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातून उरणच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयमध्ये ही औषधे मागवावी लागत आहेत. श्वानदंश झाल्यानंतर तात्काळ या औषधाची आवश्यकता असून या अतिमहत्त्वाच्या औषधांचा नियमित व पुरेसा पुरवठा करण्याची मागणी उरणच्या, जनते कडुन,नागरिकांकडूनकेली जात आहे.
उरण तालुक्यासाठी एकमेव असलेल्या इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयात श्वानदंशानंतर लागणारे 'अँटी रेबीज' औषध आणि अतिशय महत्त्वाच्या असलेल्या व धनुर्वात प्रतिबंध 'टी.टी.'च्या औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. या औषधांसाठी रुग्णांना येथे कायम प्रतीक्षा करावी लागते. वाढत्या आजारांमुळे व न परवडणाऱ्या खासगी उपचारांमुळे सामान्य नागरिक या गांधी ग्रामीण रुग्णालयात येतात. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नागरिक मोठया प्रमाणात येत असतात.त्यामुळे औषधांचा तुटवडा झाल्याने रुग्णांची खूप मोठया प्रमाणात हेळसांड सुरु आहे.दररोज ३०० पेक्षा अधिक रुग्ण या रुग्णालयात येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र तरीही शासनाकडून तात्काळ औषधपुरवठाबाबत कोणतेही गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर काही वेळा जीव गमावण्याच्या घटना घडल्या आहेत.
उरण तालुक्यात एकही अत्याधुनिक सेवा सुविधा युक्त एकही हॉस्पिटल नसल्याने उरण मधील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत.उरणमध्ये ३५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या ३० खाटांच्या रुग्णालयात आजही वैद्यकीय सुविधा अपुरी आहे. त्यामुळे उरणकरांना शेजारच्या पनवेल तालुक्यातील किंवा मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही महापालिकेच्या रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. तर काही वेळा येथील उद्योग आणि खासगी व्यवसायिक यांच्याकडे मदतीसाठी धावपळ करावी लागत आहे. सुसज्ज शासकीय रुग्णालयासाठी, नागरिकांनी अनेक आंदोलने केली. उरण मध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा युक्त हॉस्पिटल व्हावे यासाठी २०१० मध्ये शासनाने शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली आहे. मात्र रुग्णालयाच्या नवीन आराखड्याची गेल्या पंधरा वर्षांपासून प्रतीक्षा आहे.
काही दिवसांपासून 'अँटी रेबीज' औषधांचा साठा पुरेसा नव्हता. व्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून ही औषधे मागविण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत औषधपुरवठा केला जात आहे. श्वानदंशाची संख्या वाढल्याने व्यवस्थेवर ताण आहे.रुग्णांना वेळेत औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहेत. - डॉ. बाबासाहेब काळेल, अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय