पुणे – शहरात मागील २४ तासांत खून, घरफोडी, दरोडा आणि ऑनलाईन फसवणुकीसह एकूण आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खडकीत पतीकडून पत्नीचा खून
खडकी परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मांजरीत १४ लाखांची घरफोडी
मांजरी भागात अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने असा सुमारे १४ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटना
शहरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार चिंताजनकरीत्या वाढत आहेत.शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून सुमारे २० लाख रुपये उकळण्यात आले.बनावट पोलीस अधिकारी असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.अन्य प्रकरणांत APK फाईल डाउनलोड करण्यास सांगून ४ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
पुणे स्टेशन परिसरात दरोडा
पुणे स्टेशन परिसरात चार अज्ञात इसमांनी एका तरुणास मारहाण करून ऑनलाईन पद्धतीने २५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याची घटना घडली.
बनावट नोकरीचे आमिष
रेल्वेतील नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत काही जणांची फसवणूक करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना अनोळखी फोन, लिंक किंवा गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये, तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.