पुणे : पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेअंतर्गत अँटी डाकैती व अँटी व्हेईकल थेफ्ट स्क्वॉड-1 पथकाने कारवाई करत 9 ग्रॅम 63 मिलीग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थासह एका आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे 1 लाख 92 हजार 600 रुपये इतकी आहे.
दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री गस्त घालत असताना बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत, गंगाधाम ते अप्पर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी आदिल करीम बागवान (वय 35, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याचे आढळून आले.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. 39/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी डाकैती व अँटी व्हेईकल थेफ्ट स्क्वॉड-1 पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.