पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे येथे ‘भारतीयम -२०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक व सांस्कृतिक महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन २७ फेब्रुवारी २०२६ रोजी झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एंटरप्राइज आर्किटेक्ट (उद्यमरचना तज्ज्ञ) पियुष अग्रवाल,प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद,लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकमधील वरिष्ठ अधिकारी कौशिकी ठाकुरिया,उपप्राचार्य डॉ. सुनीता जाधव यांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थी नेतृत्व आणि नवोन्मेषाच्या पंचवीस वर्षांच्या परंपरेचा गौरव साजरा करत हा आठवडाभर चालणारा महोत्सव २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधून चार हजारांहून अधिक विद्यार्थी या महोत्सवात सहभागी आहेत. उदघाटन समारंभात महाविद्यालयाच्या ‘जेनर’ या वार्षिक साहित्यिक मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे दर्शन घडविणाऱ्या या मासिकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.उद्घाटन कार्यक्रमास डॉ. सचिन चव्हाण, महोत्सव समन्वयक डॉ. कुलदीप पाटील, डॉ. आय. ए. शेख, डॉ. प्रमोद जाधव, डॉ. गजानन भोळे तसेच प्रा. गौरी राव यांची उपस्थिती होती.
“उत्कृष्टता ही नेहमीच तपशीलात आणि सातत्यपूर्ण शिक्षणाच्या वृत्तीत दडलेली असते,” असे प्रतिपादन पियुष अग्रवाल यांनी केले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये उद्यम रचना तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या अग्रवाल यांनी केले.यावेळी बोलताना त्यांनी आयुष्यभर शिक्षण घेण्याची वृत्ती आणि कामातील सूक्ष्म तपशीलांकडे लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाची जागा घेणारी नसून कार्यक्षमता वाढविणारे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी नेहमी प्रामाणिक व जिज्ञासू राहावे तसेच उद्योगनिर्मितीचा मार्ग स्वीकारताना आपल्या तांत्रिक प्रकल्पांची प्रारंभापासून समाप्तीपर्यंत सखोल समज असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभावी नेतृत्वासाठी तपशीलाकडे बारकाईने पाहण्याची सवय आणि संवादासाठी पुढाकार घेण्याची वृत्ती अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले.
कौशिकी ठाकुरिया यांनी उद्योग क्षेत्रात तांत्रिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास यामध्ये समान संतुलन राखण्यावर भर दिला जात असल्याचे नमूद केले. प्रभावी संवादकौशल्य, एकाग्रतेने ऐकण्याची सवय आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण या गुणांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी विचारसरणी जोपासून स्वतःची उपाययोजना विकसित कराव्यात तसेच नव्या तंत्रज्ञान आणि कार्यसंस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता ही व्यावसायिक यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद यांनी मान्यवरांचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिमान व्यक्त केला. संस्थेची सातत्याने होत असलेली प्रगती आणि विद्यार्थ्यांना उद्योगसुसंगत अनुभव देण्याची बांधिलकी त्यांनी अधोरेखित केली. उपप्राचार्य डॉ. सुनीता जाधव यांनी स्वागतपर भाषण करून दोन दिवसांच्या महोत्सवाचा सविस्तर आढावा सादर केला.
'भारतीयम २०२६ 'चे प्रभारी डॉ. प्रमोद जाधव यांनी आभार मानले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्योग क्षेत्रातील सहकारी संस्था आणि प्राध्यापकवर्ग यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.यंदाच्या भारतीयम् २०२६ मध्ये आयडिया फोर्ज, ई-समिट २०२६ (स्टार्टअप सादरीकरण) आणि टेक्नोएक्सरेट्रो (रोबोटिक्स) यांसारख्या आठ तांत्रिक स्पर्धांचा समावेश आहे. त्याचबरोबर गझल संध्या, बॅटल ऑफ बँड्स, स्टँड-अप कॉमेडी, फॅशन युफोरिया आणि ऑटो एक्स्पो यांसारख्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली हे २८ फेब्रुवारी रोजी विशेष संवाद सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.