पुणे : मराठी साहित्याचा समृद्ध वारसा आजची तरुण पिढी अत्यंत सक्षमपणे पुढे नेत आहे, असा सूर महाराष्ट्र साहित्य परिषदेत पार पडलेल्या विश्वात्मक मायबोली उत्सवात उमटला. जय जगत सामाजिक संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कंद यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा संकल्प मांडला. या काव्यमैफिलीत श्वेता बरकडे, विशाल खोंदले, हृदयमानव अशोक, निखिल सुक्रे, डॉ. स्वप्नील चौधरी आणि सागर काकडे या निमंत्रित कवींनी आपल्या रचनांनी रसिकांची दाद मिळवली. तर विश्वात्मक अभिव्यक्ती (ओपन माईक) सत्रात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या नवोदित कवींनी आपला कलाविष्कार सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित गिरी यांनी केले, तर प्रविण शिंदे यांनी आभार मानले. विविध क्षेत्रातील रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत आणि संयोजन समितीच्या सदस्यांच्या नियोजनामुळे हा सोहळा जल्लोषात संपन्न झाला.