बदलापूर (ठाणे): बदलापूर परिसरात बेकायदेशीर स्त्रीबीज विक्री प्रकरणाचा मोठा भांडाफोड झाला असून तपासात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एका महिलेकडून एकदाच नव्हे तर 10 ते 12 वेळा स्त्रीबीज काढण्यात आल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय नियमांनुसार अशी वारंवार प्रक्रिया करणे धोकादायक आणि बेकायदेशीर मानले जाते.
माहितीनुसार, स्त्रीबीज देणाऱ्या महिलांना प्रत्येकी सुमारे 18 ते 25 हजार रुपये दिले जात होते. सोनोग्राफीद्वारे स्त्रीबीज तयार झाल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित महिलांना राज्याबाहेरील केंद्रांमध्ये पाठवून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रक्रिया केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या प्रकरणात उल्हासनगर येथील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. ती महिलांच्या तपासण्या करून स्त्रीबीज तयार असल्याची माहिती देत असल्याचा आरोप आहे. तपासाची सूत्रे नाशिकमधील काही IVF केंद्रांपर्यंत पोहोचल्याचेही समोर आले आहे.
नेमके प्रकरण काय?
बदलापूरमध्ये एका घरातूनच स्त्रीबीज वाढवण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. सुलक्षणा गाडेकर या महिलेने गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून इंजेक्शन दिल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवून शस्त्रक्रियेद्वारे स्त्रीबीज काढून त्यांची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या मते, हे रॅकेट राज्याबाहेर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महिला आयोगाची भूमिका
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, नाशिकमधील काही केंद्रांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा तपास सुरू आहे. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून बनावट कागदपत्रांच्या आधारे ओळख लपवून स्त्रीबीजांची देवाणघेवाण केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.बदलापूर पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणल्याबद्दल आयोगाकडून त्यांचे कौतुकही करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणाचे राज्यभर पसरलेले धागेदोरे उलगडण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.