नवी दिल्ली : इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या तिसऱ्या दिवशी, नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये संयत अभिमानाची भावना निर्माण झाल्याची जाणीव झाली. घोषणा साधी पण महत्त्वाची आहे. एआय अकाउंटेबिलिटी मोहिमेअंतर्गत 24 तासांत सर्वाधिक संख्येने लोकांच्या प्रतिज्ञा प्राप्त झाल्याने भारताने गिनीज जागतिक विक्रमाचा बहुमान मिळवला आहे. 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी एकंदर 250,946 वैध प्रतिज्ञा नोंदवण्यात आल्या. सुरुवातीला 5,000 चे लक्ष्य असताना या संख्येने ते अत्यंत सहजपणे ओलांडले गेले. हा केवळ एक विक्रम नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेला विवेकाने आकार देण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या युवा राष्ट्राच्या उद्देशाचे हे प्रकटीकरण आहे.
दि. 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होत असलेली ही शिखर परिषद देशभरातील आणि त्यापलीकडेही परदेशातील विद्यार्थी, शिक्षक, नवोन्मेषक आणि धोरणकर्त्यांना आकर्षित करत आहे. इंटेल इंडियाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या इंडियाकेआय मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या एआय रिस्पॉन्सिबिलिटी प्लेज मोहीमेद्वारे नागरिकांना एआयच्या नैतिक, समावेशक आणि जबाबदार वापरास वचनबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही प्रतिज्ञा पूर्ण करणाऱ्या सहभागींना डिजिटल बॅज आणि काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या एआय शिक्षणाच्या मार्गांपर्यंत पोहोचता येते. ही कृती प्रतीकात्मक असली तरी व्यावहारिक आहे. ती आपल्या उद्देशांची शिक्षणाशी सांगड घालणारी आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. त्यांनी एआयच्या जबाबदार वापरात तरुण भारतीयांना सहभागी करून घेण्याचा पंतप्रधान मोदी यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला. देशभरातील महाविद्यालयांना एकत्र आणले जात आहे, प्राध्यापकांना माहितीपूर्ण चर्चा करण्यास प्रवृत्त केले जात आहे तसेच विद्यार्थ्यांना एआयकडे शॉर्टकट म्हणून नव्हे तर सामाजिक कल्याणाचे एक साधन म्हणून पाहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यांनी प्रतिज्ञा घेतलेल्या 250,000 हून अधिक सहभागींचे कौतुक करतानाच एआयच्या मूळ हेतूसह त्याचा जबाबदारीने स्वीकार केला पाहिजे हा भारताचा दृष्टिकोन स्पष्ट असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमस्थळी असलेल्या ऊर्जेतून ही स्पष्टता प्रतिबिंबित होते. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे, देशातील 65 टक्क्यांहून अधिक लोक 35 वर्षांच्या आतील वयोगटाचे आहेत. शिखर परिषदेत जाणीवपूर्वक भर देऊन या लोकसंख्याशास्त्रीय शक्तीच्या वापराच्या शक्यतेची चाचपणी केली जात आहे. संवाद केवळ अल्गोरिदम आणि पायाभूत सुविधांपुरतेच मर्यादित नाहीत. या चर्चा साक्षरता, नीतिमत्ता आणि दीर्घकालीन क्षमता मुद्द्यांवरही फिरत आहेत. एआय आता फार दूरचे तंत्रज्ञान राहिलेले नसल्याची सर्वसाधारण भावना दिसून येत आहे. ते आता तयार होण्याच्या मार्गावर असलेले जीवन कौशल्य आहे.
युवाएआयi ग्लोबल युथ चॅलेंज विजेत्यांच्या घोषणेतून ही भावना स्पष्ट दिसून येते. इंडियाएआय मिशनमधून जन्मास आलेल्या या स्पर्धेसाठी 38 देशांमधून 2,500 हून अधिक अर्ज आले होते. 13 ते 21 वयोगटातील तरुण नवोन्मेषक लोक, रृथ्वी आणि प्रगती या संकल्पनेच्या वर आधारित एआय सोल्यूशन्स तयार करत आहेत. त्यांच्या कल्पना सार्वजनिक आरोग्य, शेती, हवामान लवचिकता, सुलभता, स्मार्ट गतिशीलता आणि डिजिटल विश्वास यासारख्या व्यापक विषयांवर आधारित आहेत. पहिले 70 संघ आता शिखर परिषदेत काम करणारे प्रोटोटाइप प्रदर्शित करत आहेत. ते धोरणकर्ते आणि गुंतवणूकदारांशी बोलत आहेत. ते केवळ सहभागी राहिलेले नाहीत. ते आता समस्या सोडवणारे झाले आहेत.
हा जागतिक सहभाग काहीतरी मोठे संकेत देणारा आहे. भारत केवळ स्थानिक प्रतिभेचीच जोपासना करत नाही. तर जबाबदार एआयमध्ये ते स्वतःचे संघटित शक्ती म्हणून स्थान निर्माण करत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाने एमइआयटीवाय अंतर्गत सुरू केलेला, युवा कार्यक्रम इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एआय आणि सामाजिक कौशल्यांसह तयार करतो. तो त्यांना दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या असलेल्या आठ विषयगत क्षेत्रांमध्ये एआय लागू करण्यास प्रोत्साहित करते. शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि न्याय ही आता अमूर्त क्षेत्रे राहिलेली नाहीत. हे जिवंत वास्तव असून ते तरुण मनांना कोड आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून शोध घेण्यास शिकवत आहे
याशिवाय, युवा एआय फॉर ऑल हा मोफत राष्ट्रीय एआय साक्षरता अभ्यासक्रम अकरा भारतीय भाषांमधून शिकवला जात आहे. दिक्षा, आयगॉट कर्मयोगी आणि फ्युचर स्किल्स च्या माध्यमातून तो उपलब्ध असून 1 कोटी नागरिकांमध्ये मूलभूत AI कौशल्ये निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. ही महत्त्वाकांक्षा धाडसी आहे. ती ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याचा आणि शहरी-ग्रामीण यांच्यातील फरक कमी करण्याचा प्रयत्न करते. हे करताना, पूर्वी डिजिटल साक्षरता जेवढी आवश्यक मानली जात होती तितकीच एआय साक्षरताही आवश्यक मानती जात आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा आता या जनचळवळीचाच नैसर्गिक विस्तार असल्याचे वाटत आहे.
शिखर परिषदेच्या दुसऱ्या बाजूला, कशा प्रकारे तळागाळातील नवोन्मेषी उपक्रम राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना बळकटी देत आहेत, त्याचे प्रदर्शन नीती आयोगांतर्गत 'अटल नवोन्मेष मोहीम' करत आहे. 'एआय टिंकरप्रेन्योर' प्रदर्शनात भारतातील अटल टिंकरिंग प्रयोगशाळांमधील 50 विद्यार्थी संघ एकत्र आले आहेत. त्यांचे प्रकल्प आरोग्य सेवेतील त्रुटी, पीक व्यवस्थापन, हवामान अनुकूलन आणि सुलभ शिक्षण यांसारख्या समस्यांवर उपाय शोधत आहेत. या वर्षीच्या आवृत्तीत 12,000 हून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. कठोर मूल्यमापनानंतर, सर्वोत्तम 50 संघ आज येथे उपस्थित आहेत. हे संघ प्रायोगिक वृत्तीचे दर्शन घडवतात, ज्याचे आता हळूहळू नवोन्मेषाच्या संस्कृतीत रूपांतर होत आहे.
प्रदर्शनाच्या पलीकडे, एक व्यापक परिसंस्था आकाराला येत आहे. सरकार विविध स्तरांवर कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण आणि कौशल्य विकासाला पाठबळ देण्यासाठी सातत्याने आराखडे तयार करत आहे. आर्थिक वर्ष 2026 ते 27 चा केंद्रीय अर्थसंकल्प उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी केलेल्या निधीच्या तरतुदीद्वारे या दिशेला अधिक बळकट करतो. मुंबईतील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज'ला मिळणाऱ्या पाठबळामुळे 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी सुसंगत 'आशय निर्मिती प्रयोगशाळा' स्थापन करण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे ऍनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल सामग्रीसह 'ऑरेंज इकॉनॉमी'शी संबंधित क्षेत्रांमध्ये अंदाजे 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे
या शिखर परिषदेतून विस्तारित संगणकीय क्षमतेच्या बातम्याही समोर येत आहेत. भारत आगामी काही आठवड्यांमध्ये आपल्या सध्याच्या 38,000 च्या आधारभूत संख्येत आणखी 20,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सची भर घालणार आहे. पायाभूत सुविधा आणि नीतीमत्ता आता एकत्रितपणे प्रगती करत आहेत. विस्तारासोबतच जबाबदारीचे भानही राखले गेले पाहिजे हा संदेश सातत्याने दिला जात आहे आणि हा समतोल राखण्यासाठी कुशल कार्यबल केंद्रस्थानी आहे.
शाळांमधील वर्गांपासून ते प्रगत संशोधन प्रयोगशाळांपर्यंत, प्रगतीचे मार्ग तयार केले जात आहेत. आरोग्य सेवा, कृषी आणि शाश्वत शहरे या क्षेत्रांतील 'उत्कृष्टता केंद्रे' आधीच कार्यान्वित झाली आहेत. शिक्षणासाठी चौथ्या 'उत्कृष्टता केंद्रा'ची घोषणा करण्यात आली आहे. कौशल्य विकासासाठीची 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे तरुणांना उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांनी सज्ज करत आहेत. जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आलेला 'सोअर' (SOAR) अर्थात स्किलिंग फॉर एआय रेडीनेस हा उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संरचित अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो. व्यावसायिक स्तरावर, कारागीर प्रशिक्षण योजनेने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औद्योगिक रोबोटिक्ससह नवीन युगाशी सुसंगत 31 अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमार्फत शिकवले जात आहेत.
खुद्द शासनामध्ये देखील, सरकारी अधिकाऱ्यांसाठीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षमता आराखड्याद्वारे क्षमता बांधणी सुरू आहे. हा आराखडा सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांना आवश्यक कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि धोरणनिर्मिती तसेच प्रशासनात त्यांचा वापर करण्यासाठी संरचित प्रशिक्षण प्रदान करतो. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान केवळ वर्गापुरते किंवा खाजगी उद्योगांपुरते मर्यादित न राहता सार्वजनिक व्यवस्थेपर्यंत विस्तारले जाईल याची हमी मिळते.
उच्च शिक्षण आणि संशोधनाला 'इंडिया एआय' मोहिमेअंतर्गत थेट पाठबळ दिले जात आहे. 500 पीएचडी धारक, 5,000 पदव्युत्तर विद्यार्थी आणि 8,000 पदवीपूर्व विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यवृत्ती आणि पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. जुलै 2025 पर्यंत, 200 हून अधिक पाठ्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या आहेत आणि 73 संस्थांमध्ये पीएचडी उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा स्थापन केल्या जात आहेत. 'नायलीट' (NIELIT) आणि उद्योग भागीदारांच्या सहकार्याने 31 प्रयोगशाळा आधीच सुरू करण्यात आल्या आहेत, तर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अतिरिक्त प्रयोगशाळांसाठी 174 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतन संस्थांची शिफारस केली आहे. प्रगत साधनांची उपलब्धता आता केवळ काही मोजक्या महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
शिखर परिषद जसजशी पुढे जात आहे, तसतसे तेथील वातावरण संयमित तरीही आत्मविश्वासपूर्ण आहे. येथील चर्चा भविष्याचा वेध घेणाऱ्या, तरीही प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित आहेत. किशोरवयीन मुले जेव्हा त्यांच्या प्रकल्पांच्या प्राथमिक प्रतिकृतींचे (prototypes) सादरीकरण करतात, तेव्हा धोरणकर्ते ते लक्षपूर्वक ऐकतात. उद्योग क्षेत्रातील नेते अशा कल्पनांच्या शोधात आहेत ज्यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करणे शक्य आहे आणि जे नैतिक निकषांची पूर्तता करणारे आहेत. ही देवाणघेवाण केवळ औपचारिक न वाटता अधिक परिणामकारक वाटत आहे.
गिनीज रेकॉर्डची मान्यता हा एक महत्त्वाचा क्षण आहे, परंतु त्यामागील संकल्प अधिक सखोल आहे. भारत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहे, संशोधनाला चालना देत आहे, कौशल्य विकासाची साखळी बळकट करत आहे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची नैतिकता निश्चित करण्यासाठी आपल्या तरुणांना आमंत्रित करत आहे. हा जागतिक विक्रम कदाचित 24 तासांत प्रस्थापित झाला असेल, परंतु त्यातून व्यक्त झालेली वचनबद्धता मात्र पिढ्यानपिढ्या चालणारी आहे.