पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे बौद्धिक संपदा हक्क म्हणजेच आपल्या कल्पना, शोध आणि निर्मितींवर मिळणारे कायदेशीर अधिकार या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींना त्यांच्या नवकल्पना आणि संशोधनाचे कायदेशीर संरक्षण कसे करावे याची सोपी व स्पष्ट माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात ऑल इंडिया शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आयओआयटी, पुणे येथील प्रा. डॉ. विनायक बैरागी यांनी “नवकल्पना आणि पेटंटची मूलभूत माहिती” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थिनींनी केवळ संशोधन न करता त्याचे कायदेशीर संरक्षण करून समाजोपयोगी नवकल्पना विकसित कराव्यात, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पोस्टर व सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. विविध विभागांतील विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवत सर्जनशील सादरीकरणे केली. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कल्पकतेला आणि आत्मविश्वासाला नवे व्यासपीठ मिळाले.
ड्रीम हंट इंडिया, पुणे यांच्या संस्थापक सौ. मनीषा भाटी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे, उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार, विभागप्रमुख डॉ. संदीप पाटील, परीक्षक मंडळ तसेच बौद्धिक संपदा हक्क समन्वयक डॉ. शारदा कोरे उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर घेतलेल्या अभिप्रायातून ८४ टक्के सहभागी विद्यार्थिनींनी भविष्यात आपल्या शोधांसाठी पेटंट नोंदणी करण्याची इच्छा व्यक्त केली. हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये संशोधन आणि शोधसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला.