लंडन/तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील काही माध्यमांनी एक मोठा दावा समोर आणला आहे. त्यानुसार, इस्रायलने अनेक वर्षे खामेनी यांच्या हालचालींवर अत्यंत बारकाईने नजर ठेवली होती.
माहितीनुसार, तेहरान शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेत घुसखोरी करून हालचालींची माहिती गोळा केली जात होती. इतकेच नव्हे तर मोबाईल नेटवर्क प्रणालीतही शिरकाव करून विविध अधिकाऱ्यांच्या हालचालींचे विश्लेषण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण आराखडा समजून घेणे शक्य झाल्याचे सांगितले जाते.
दीर्घकालीन गुप्त ऑपरेशनचा दावा
या कथित कारवाईत इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांपैकी Unit 8200 आणि Mossad यांची भूमिका असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तांत्रिक प्रणालींमध्ये प्रवेश मिळवून सीसीटीव्हींचे थेट फीड आणि मोबाईल लोकेशन डेटा यांचा वापर करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.
यातून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ड्युटी बदलण्याच्या वेळा, वाहनांची हालचाल, निश्चित मार्ग आणि इतर सवयी यांचा ‘पॅटर्न ऑफ लाइफ’ तयार करण्यात आला. म्हणजेच दैनंदिन हालचालींचे विश्लेषण करून सविस्तर नकाशा तयार करण्यात आल्याचा दावा आहे.
सीसीटीव्ही ठरले निरीक्षणाचे साधन?
साधारणपणे वाहतूक नियंत्रण किंवा सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, जर हॅक झाले तर तेच निरीक्षणाचे प्रभावी साधन बनू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. संबंधित अहवालानुसार, काही डेटा बाहेरील सर्व्हरवर पाठवला जात असल्याने स्थानिक प्रणालीपुरता तो मर्यादित राहिला नाही.
मोबाईल नेटवर्कमधील संभाव्य घुसखोरीमुळे कोणता फोन कोणत्या परिसरात आहे, याची माहिती मिळवणे शक्य होते. त्यामुळे सुरक्षा हालचालींचे अधिक अचूक चित्र समोर येत गेले, असा दावा करण्यात आला आहे.
संयुक्त हवाई कारवाईचा उल्लेख
ब्रिटिश माध्यमांच्या दाव्यानुसार, आवश्यक माहिती संकलित झाल्यानंतर लक्ष्य निश्चित करून कारवाईची आखणी करण्यात आली. स्थान, वेळ आणि सुरक्षेतील उणिवा लक्षात घेऊन रणनीती ठरवण्यात आली. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलने अमेरिकेसोबत केलेल्या संयुक्त हवाई कारवाईत खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा या वृत्तांत करण्यात आला आहे.मात्र, या सर्व दाव्यांबाबत अधिकृत स्तरावर स्पष्ट आणि एकमताने पुष्टी झालेली नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात अजूनही चर्चा सुरू आहे.