पिंपरी-चिंचवड : पिंपरी - चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर पोलिस स्टेशन हद्दीत भटक्या कुत्र्यावर अमानुष वागणूक दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारास तुकारामनगर परिसरात ही घटना घडली. स्वप्निल सखाराम सावंत या व्यक्तीने रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्याला पकडून त्याला हवेत फिरवत जमिनीवर आपटल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संबंधित कुत्रा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेनंतर आरोपीसह काही जणांनी रस्त्यावर गोंधळ घातल्याचे तसेच त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन वेगाने चालवत त्या कुत्र्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे.
संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्निल सखाराम सावंत याच्याविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच घटनेत सहभागी इतर व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.