वसई : होळीच्या पूर्वसंध्येला वसईतील सातीवली परिसरात एका नवख्या चालकाकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे नऊ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सातीवलीतील मौर्या नगर परिसरात मोबिन मोनिर अहमद (वय ४९) हा मित्राची शेवरलेट ‘बीट’ कार घेऊन फिरत होता. गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवत असताना त्याच्याकडून चुकून ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबले गेले. त्यामुळे कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांवर आदळली.
या धडकेत नऊ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींना प्लॅटिनम हॉस्पिटल, तिघांना डी.एम. पेटिट हॉस्पिटल तर एका जखमीवर विवान हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले. सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. काहींना तीन ते पाच टाके घालावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवले. मोठी गर्दी जमल्याने काही वेळ वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी वालीव पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक चौकशीत चालक नव्याने वाहन चालवू लागल्याची बाब समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.