सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 विश्लेषण

इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाचा परिणाम मुंबईत; गॅस तुटवड्यामुळे 20% हॉटेल्स बंद

डिजिटल पुणे    10-03-2026 12:17:57

मुंबई:अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत तर 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12 हजार इराणी नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम भारतासह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही दिसू लागले आहेत.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील संघर्षाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले आहेत. या युद्धामुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने मुंबईत व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी शहरातील सुमारे 10 ते 20 टक्के हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहार हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अनेक हॉटेल्सकडे फक्त आज आणि उद्यापुरता गॅस साठा उपलब्ध आहे. जर पुढील तीन दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुंबईतील जवळपास 50 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते.

घरगुती एलपीजीला प्राधान्य

सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याने केंद्र सरकारने घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तेल रिफायनरीजना अधिक एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश देण्यात आले असून ते मुख्यतः घरगुती ग्राहकांसाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी एलपीजी बुकिंगदरम्यान 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी लागू करण्यात आला आहे, जेणेकरून साठेबाजी किंवा काळाबाजार रोखता येईल.

व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर लघुउद्योगांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. मात्र आयातित एलपीजीचा वापर रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी प्राधान्याने केला जाणार आहे.

सोलापूरमध्ये विशेष पथक

दरम्यान, इंधन तुटवडा निर्माण झाल्यास काळाबाजार रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने विशेष भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरगुती एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि त्याचा अवैध वापर होऊ नये यासाठी गॅस वितरकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र पथक नेमण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक इंधन बाजारातील अनिश्चितता वाढल्याने पुढील काही दिवस परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती