पुणे : इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी पुरवठ्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ-मोठ्या रांगा लावल्या आहेत, अशातच पुण्यातही शिवाजीनगर भागातील गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांनी गर्दी केली आहे.मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल तणावाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा दिसू लागल्या आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील गॅस एजन्सीबाहेरही नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. पुरवठा विभागाकडून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक ग्राहकांना मोबाईलद्वारे सिलेंडर बुक करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जाते. काहींनी बुकिंग करूनही अनेक दिवस सिलेंडर घरी पोहोचला नसल्याची तक्रार केली आहे.
पुण्यात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि नोकरीसाठी राहणारे बॅचलर मोठ्या प्रमाणात खानावळींवर अवलंबून असतात. मात्र व्यावसायिक गॅसची कमतरता निर्माण झाल्याने अनेक खानावळी बंद ठेवण्याची वेळ येऊ लागली आहे. काही ठिकाणी उपलब्ध गॅस आज संध्याकाळपर्यंतच पुरेल, असे सांगत मालक विद्यार्थ्यांचे पैसे परत करत असल्याचे समोर आले आहे.
मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यता
व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे मिठाईच्या किमती वाढवाव्या लागू शकतात, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. पुण्यातील काही मिठाई विक्रेत्यांनी गॅसचा पुरवठा कमी झाल्याने डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगडींचा पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने त्याचा परिणाम दरांवर होऊ शकतो.
सोलापुरातही तशीच स्थिती
सोलापुरातील काही प्रसिद्ध उपहारगृहांमध्ये फक्त एक-दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरल्याची माहिती समोर आली आहे. जर लवकर पुरवठा झाला नाही तर शाखा टप्प्याटप्प्याने बंद कराव्या लागू शकतात, अशी चिंता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
घरगुती ग्राहकांना कंपन्यांचा दिलासा
दरम्यान, काही गॅस कंपन्यांकडून ग्राहकांना संदेश पाठवून देशात इंधनाची कमतरता नसल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅसचा वापर संयमाने करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
इतर शहरांमध्येही परिणाम
ठाणे, अकोला यांसारख्या शहरांमध्येही व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याची तक्रार समोर येत आहे. काही ठिकाणी मागणीच्या तुलनेत पुरवठा निम्म्यावर आल्याने ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे हॉटेल, स्वीट मार्ट आणि कॅटरिंग व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.परिस्थिती काही दिवस अशीच राहिल्यास खाद्य उद्योगावर त्याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.