सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
 जिल्हा

गॅस टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; व्यावसायिकांनी सरकारकडे धाव, केरोसिनचा पर्याय वापरण्याचा छगन भुजबळांचा सल्ला

डिजिटल पुणे    11-03-2026 14:50:32

मुंबई : आखाती भागातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता राज्यातील हॉटेल उद्योगावरही जाणवू लागला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या काही हॉटेल्स शिल्लक गॅस साठ्यावर व्यवसाय सुरू ठेवत असली तरी ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील दोन दिवसांत सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, सध्या जगभरात तणावाचे वातावरण असून त्याचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार आणि गॅस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवून एलपीजी उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा हा सरकारचा प्रमुख प्राधान्यक्रम असल्याने हॉटेल उद्योगासाठी तातडीने काही निर्णय घेणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांनी हॉटेल व्यावसायिकांना पर्याय म्हणून केरोसिनचा वापर करण्याचा सल्ला दिला. मात्र हॉटेल मालकांनी यासाठी त्यांच्या स्वयंपाकघरातील यंत्रणा बदलावी लागेल, असे सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विक्रेत्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून बेकायदेशीर साठा रोखण्यासाठी कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणीही अतिरिक्त गॅस साठवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या केवळ रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेल्ससह इतर व्यावसायिकांना गॅस मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सोलापूरमध्येही अशाच प्रकारचे चित्र दिसून आले आहे. रामवाडी परिसरातील गॅस एजन्सीसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गॅस मिळेल की नाही या भीतीने अनेक ग्राहकांनी एकाच वेळी बुकिंग करण्यास सुरुवात केली. अचानक वाढलेल्या मागणीमुळे ऑनलाइन बुकिंग प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक थेट एजन्सीकडे जाऊन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती