सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : लायबेरियाचे झेंडे लावले, सिग्नल सिस्टीम बंद केली...; युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत दाखल
 जिल्हा

मुंबईत विधानभवनासह ४ ठिकाणांना मिसाईल-बॉम्बची धमकी; सभापती राम शिंदे म्हणाले – सुरक्षा यंत्रणा सतर्क

डिजिटल पुणे    12-03-2026 12:03:23

मुंबई : मुंबईत आज सकाळी विधानभवन परिसरात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली. विधानभवनासह शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या मेलची माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या.

धमकीचा मेल मिळाल्यानंतर विधानभवन परिसरात पोलिसांनी तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी कर्मचारी आणि इतरांना प्रवेश रोखण्यात आला होता. त्यानंतर ओळखपत्र तपासणी आणि सुरक्षा पडताळणीनंतर कर्मचाऱ्यांना आत सोडण्यात आले.

या प्रकरणाबाबत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज सकाळी सुमारे 6.57 वाजता सीपीएच्या मेलवर ही धमकी आली. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. बॉम्ब निकामी पथकाकडून परिसराची सखोल तपासणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मेलमध्ये मुंबईतील आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि एका बँकेचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तपास सुरू असल्यामुळे सध्या अधिक तपशील जाहीर करणे योग्य ठरणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती दिली जाईल.

प्राथमिक माहितीनुसार, हा धमकीचा मेल परदेशातून पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून तो काही अतिरेकी विचारसरणीशी संबंधित व्यक्तींशी जोडलेला असू शकतो. मात्र याबाबत अधिकृत तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती