पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांदरम्यान प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट करत सांगितले की, जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून रांगा लावू नयेत.
प्रशासनाने सध्या घरगुती वापरासाठी गॅस उपलब्ध राहावा यासाठी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वापरावर तात्पुरती मर्यादा घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागरिकांना साधारण २५ दिवसांच्या कालावधीत नियमितपणे सिलिंडर मिळत आहे आणि पुढील काळातही पुरवठा खंडित होणार नाही.
रुग्णालये, आरोग्य संस्था, आपत्कालीन सेवा तसेच विद्यार्थ्यांची वसतिगृहे या अत्यावश्यक क्षेत्रांना गॅस पुरवठा प्राधान्याने करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने सांगितले. विशेषतः हॉटेल व खानावळींवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, गॅस सिलिंडरची जादा दराने विक्री किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ अंतर्गत दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करून सिलिंडर जप्त केला जाईल, तसेच वितरकाचा परवाना रद्द करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते.
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून काही ठिकाणी आधीच कारवाई करण्यात आली आहे. काही वितरकांनी गर्दी नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली असल्याने प्रशासनाने त्यासाठीही मदत उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावर चुकीचे संदेश किंवा अफवा पसरवू नयेत, तसेच घरात गॅसचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. गॅस पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी थेट संबंधित वितरक किंवा जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.