भारतीय रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावर वाढवली सीसीटीव्ही देखरेख आणि प्रवासी सुरक्षा
पुणे विभागातील 43 स्थानकांवर 854 कॅमेरे बसवले; पुणे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा अधिक मजबूत
Posted On: 13 MAR 2026 7:26PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वे देशभरातील मार्ग, स्थानके आणि पायाभूत सुविधा यामध्ये प्रवासी सुरक्षिततेसाठी नवे उपाय करत आहे. यासाठी देखरेख यंत्रणांचा विस्तार केला जात आहे आणि प्रगत देखरेख तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुणे रेल्वे विभागातील सर्व क्रॉसिंग रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येत आहेत. त्यामुळे देखरेख सुधारेल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक हमी मिळेल. भागातील 43 स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 854 कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. याशिवाय पुणे रेल्वे स्टेशनवरील देखरेख करणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात मजबूत करण्यात आल्या आहेत. विद्यमान व्हिडिओ देखरेख यंत्रणे अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या 75 वरून 160 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
संवेदनशील रेल्वे स्टेशनवर ही यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने एकात्मिक सुरक्षा प्रणाली (आयएसएस) बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. आयएसएस मध्ये क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही), निगराणी प्रणाली, प्रवेश नियंत्रण प्रणाली, व्यक्ती आणि सामान तपासणी प्रणाली तसेच स्फोटक शोध प्रणाली अशा विविध सुरक्षा प्रणालींचा समावेश या उपक्रमांतर्गत एकूण 228 बॅगेज स्कॅनर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय 420 प्रशिक्षित श्वानांची नेमणूक विविध विभागांमध्ये करण्यात आली असून ते स्फोटक शोधणे आणि ट्रॅकिंगसाठी वापरले जातात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा तयारी अधिक मजबूत झाली आहे.
भारतीय रेल्वेने प्रवाशांची मोठी गर्दी होणारी 76 स्थानकं निवडली आहेत. त्या ठिकाणी गर्दीच्या काळात गर्दी नीट हाताळण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी योग्य योजना तयार करण्याची तयारी केली जात आहे. या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून वॉकी-टॉकीज, घोषणा आणि कॉलिंग प्रणाली अशी अद्ययावत संपर्क उपकरणे उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे समन्वय आणि प्रवासी माहिती प्रसारण सुधारेल. गर्दीच्या वेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या वॉर रूम देखील नियोजित आहेत. त्यामुळे देखरेख नीट होईल आणि वेळेवर प्रतिसाद देता येईल.
भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवर (थांबे वगळता) सीसीटीव्ही प्रणाली बसवणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आतापर्यंत 1825 स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित व्हिडिओ विश्लेषण सुविधांनी सज्ज आहे. घुसखोरी, गाडीतून पडलेली व्यक्ती ओळखणे या यंत्रणेमुळे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष वेळेत पाहणी सोपी होते, घटना लगेच लक्षात येतात आणि प्रवासी सुरक्षितता तसेच स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थापन सुधारते.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरांदरम्यान ही माहिती दिली.