नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत जागतिक पातळीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले. जगातील संघर्ष कमी करण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचे अमेरिकेतील नेतेही सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भारताने मुत्सद्देगिरीच्या जोरावर महत्त्वाची कामगिरी केल्याचेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस म्हणाले की, सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अधिकृत भूमिका केंद्र सरकारकडून मांडली जाईल. मात्र, ज्यांनी मोदींच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांना पंतप्रधानांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. त्यामुळे देशातील काही नेत्यांनी अनावश्यक वक्तव्ये करण्याऐवजी परिस्थिती समजून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची मानली जाणारी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' ही सामुद्रधुनी सध्या तणावाच्या केंद्रस्थानी आहे.इराण आणि संयुक्त संस्थाने यांच्यातील वाढत्या तणावामुळे या मार्गावर अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणने हा मार्ग पूर्णपणे बंद केलेला नसला तरी त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या देशांच्या जहाजांनाच मार्ग देण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताने राजनैतिक चर्चांद्वारे भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांसाठी सुरक्षित मार्ग मिळवल्याची चर्चा आहे.
याच मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी काँग्रेसवरही टीका केली. आखाती भागातील तणावामुळे देशात गॅस आणि इंधनाचा तुटवडा असल्याची भीती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नाही, असे त्यांनी सांगितले.
गॅस एजन्सीबाहेर दिसणाऱ्या रांगा या प्रत्यक्ष तुटवड्यामुळे नसून विरोधकांनी निर्माण केलेल्या भीतीमुळे असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे काही नेते लोकांमध्ये घबराट निर्माण करत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे फडणवीसांनी म्हटले.यावर पुरावे मागितले असता त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत विरोधकांवरच प्रतिप्रश्न उपस्थित केला.