पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. काही काळापासून त्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 मार्च रोजी पहाटे सुमारे दोनच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडने जात होत्या. त्याच वेळी सुमारे सहा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या संपूर्ण घटनेचे दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हल्ल्यादरम्यान महिलेने दगड उचलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांच्या झुंडीसमोर त्यांचा प्रतिकार अपुरा ठरला.
कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे काही मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
सकाळी स्थानिक नागरिकांना उड्डाणपुलाखाली विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह दिसून आला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला या प्रकरणात खून किंवा अन्य गुन्ह्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती
या घटनेनंतर चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. पूर्वी रात्री उशिरा किंवा पहाटे फिरायला बाहेर पडणाऱ्या लोकांवर अशा घटना घडत असत, मात्र आता दिवसा देखील लहान मुले आणि वृद्धांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.