पुणे: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचे सावट दिसून आले असून आनंदनगर भागात एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव करण काशीद (रा. धायरी) असे असून तो सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता आनंदनगर येथील अरविंद सोसायटीजवळ उभा होता. त्याच वेळी तिघे हल्लेखोर तेथे आले आणि अचानक त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने अनेक वार केल्याने करण गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला.घटना भरवस्तीत घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपी तात्काळ पसार झाले. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस तपास सुरू आहे.