धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा जबर फटका बसला आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या कलिंगड पिकावर गारपिटीचा तडाखा बसल्याने संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, इतकी तीव्र गारपीट त्यांनी आयुष्यात प्रथमच अनुभवली. जमिनीवर तीन ते चार इंच जाडीचा गारांचा थर साचला होता, तर काही ठिकाणी लिंबाएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. या गारांमुळे कलिंगडांना तडे गेले असून त्यामध्ये आतून सड सुरू झाली आहे.
या परिस्थितीत नुकसान झालेलं पीक बाजारात विक्रीसाठीही योग्य राहिलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. आधीच खर्च केलेल्या पैशाचा परतावा मिळणं कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.