मुंबई : आपत्कालीन परिस्थितींना अधिक सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः गर्भवती महिलांसारख्या संवेदनशील घटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे प्रभावी ट्रॅकिंग, वेळेवर वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.मराठवाड्यातील पूरसदृश्य परिस्थितीत गर्भवती महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी त्यांचे ट्रॅकिंग करण्याबाबत विधानसभेत सदस्य प्रशांत बंब यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदस्य नमिता मुंदडा यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्यात पावसाची व महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास आरोग्य विभागाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात येतात. मागील महापुराच्या काळात धाराशिव तसेच इतर प्रभावित भागांमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांनी प्रभावी नियोजन करून नागरिकांना आवश्यक त्या सेवा पुरवल्या. या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.भविष्यात राज्य शासनाकडून आपत्ती काळात आरोग्य सेवा अधिक सक्षम व सर्वसमावेशक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, यामध्ये स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट करण्यात येणार असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.