मुंबई : पुणे येथील नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रोड प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य भीमराव तापकीर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. रस्त्याचा उतार अत्यंत तीव्र नसला तरी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एलिव्हेटेड रोड उभारणे आवश्यक आहे.
मागील चार वर्षांची अपघातांची आकडेवारी देताना मंत्री कदम यांनी सांगितले की, 2022 मध्ये 12 अपघात झाले होते, 2023 मध्ये तीन, 2024 मध्ये पाच, तर 2025 मध्ये अपघातांची संख्या वाढून 16 झाली आहे. मृतांची संख्या 2022 मध्ये चार, 2023 मध्ये दोन, 2024 मध्ये तीन असून, 2025 मध्ये एका अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 11 वर पोहोचली होती. जखमींना आवश्यक ती आर्थिक मदत आणि उपचारही देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, संबंधित ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. अपघात होवू नयेत म्हणून रस्त्याची रुंदी 7 मीटरवरून 10.5 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच वेगमर्यादा 60 किमी प्रतितासवरून 40 कि.मी. करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस बंदोबस्त वाढविणे, स्वयंसेवकांची नियुक्ती, तसेच जड वाहनांसाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त बैठका घेऊन विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, कायमस्वरूपी तोडगा म्हणून एलिव्हेटेड रोड प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहेच असेही त्यांनी सांगितले.या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शंकर जगताप यांनी सहभाग घेतला.