सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
  • मोठी बातमी : भोंदूबाबा अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
  • देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 जिल्हा

नायगाव (टिवरी) जमीन व्यवहार प्रकरणी फेरफार रद्द करून चौकशी करण्यात येईल – राज्यमंत्री योगेश कदम

डिजिटल पुणे    25-03-2026 10:55:19

मुंबई : पालघर जिल्ह्यातील नायगाव (टिवरी) येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी  संबंधित फेरफार रद्द करून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.या प्रकरणाबाबत सदस्य विलास तरे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य प्रशांत बंब, वरुण सरदेसाई यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात काही आरोपींना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली होती. मात्र, ही पॉवर ऑफ अटर्नी दिल्यानंतर अवघ्या सात दिवसांत ती रद्द करण्यात आली होती. तथापि, रद्द झालेल्या पॉवर ऑफ अटर्नीचाच आधार घेत काही व्यक्तींनी जमीन व्यवहार केल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर काही प्रकरणांत स्वतःलाच अधिकार देत जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्याचे प्रकारही समोर आले. शासनाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तत्काळ कारवाई करत संबंधित जमिनीवरील फेरफार (म्युटेशन) रद्द करण्यात आले असून मूळ मालकांची नावे पुन्हा नोंदवण्यात आली आहेत.या प्रकरणातील तक्रारदार आणि संबंधित पक्षकारांनी न्यायालयात परस्पर समझोत्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. दोन्ही बाजूंमध्ये तडजोडीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, संबंधित पॉवर ऑफ अटर्नी ही नोंदणीकृत (रजिस्टर्ड) नव्हती. त्यामुळे नोंदणी कार्यालयात तिची माहिती उपलब्ध नसणे स्वाभाविक होते. तरीदेखील, पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे झालेल्या नोंदणी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देण्यात आले असून संपूर्ण व्यवहाराची छाननी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे सांगत, आवश्यक ती पुढील कारवाई तत्काळ करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले

सांताक्रुझ प्रकरणात अमली पदार्थ सेवनाचे पुरावे नसून सार्वजनिक गैरवर्तनावर पोलिसांची कारवाई  – राज्यमंत्री योगेश कदम 

सांताक्रुझ येथील फॉर्च्यून हाईट गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात पब्लिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमधील काही विद्यार्थी अमली पदार्थांचे सेवन करत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी केली असून याबाबत कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. परंतु सार्वजनिक ठिकाणी  गैरवर्तनाच्या काही घटना निदर्शनास आल्याने त्यावर मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत (कोटपा अ‍ॅक्ट) कारवाई करण्यात आली आहे. असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.

सांताक्रुझ येथील फॉर्च्यून हाईट गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात पब्लिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमधील काही विद्यार्थी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य संजय पोतनीस यांनी विधानसभेत मांडला. या चर्चेत नाना पटोले, अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले,  सांताक्रुझ परिसरात विद्यार्थ्यांकडून अमली पदार्थ सेवन तक्रार प्रकरणी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून नागरिकांच्या शंका दूर करण्यात आल्या आहेत. राज्यात अमली पदार्थांविरोधात कठोर धोरण राबविण्यात येत असून केवळ सेवन करणाऱ्यांवरच नव्हे तर पुरवठा करणाऱ्या पेडलर्सवरही कठोर कारवाई केली जात आहे. मकोका कायद्यांतर्गतही आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. तसेच, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) स्थापन करून ड्रग्जविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत, राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबईत अमली पदार्थांविरोधात आक्रमक कारवाया करण्यात आल्या असून मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार पोलीस यंत्रणा दक्षतेने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी विशिष्ट माहिती उपलब्ध करून दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरमधून गॅस चोरीप्रकरणी कारवाई – राज्यमंत्री योगेश कदम

अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव बायपास रोडवर टँकरमधून गॅसची चोरी करून अनधिकृत साठा करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. आमदार संजय पोतनीस यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम राबवण्यात आली. संबंधित टँकर पुण्यातून–छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, वाहतुकीदरम्यान काही टँकर चालक गॅसची जाणीवपूर्वक गळती करून त्याची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. हा चोरी केलेला गॅस काही ठिकाणी थांबून अनधिकृतरित्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवहार सुरू होते, त्या सर्व ठिकाणांवर छापे टाकून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, या प्रकरणात केंद्र सरकारचा अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला असून, त्याअंतर्गत कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. गरज भासल्यास हा कायदा आणखी कडक करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. अलीकडेच पुण्यात तीन टँकर पकडण्यात आले आहेत, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून नियमित कारवाई सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती