उरण : उरण नगर परिषदेत भ्रष्टाचार झाला असून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी तो भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. यामुळे उरण मध्ये राजकीय वर्तुळात एकच खळ बळ माजली आहे.उरण नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक स्फोटक घोटाळा उघडकीस आला आहे. 'भाडे आणि टेंडर'च्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून एका जिवंत कंत्राटदाराच्या नावावर तब्बल दहा वर्षे व्यवहार चालवल्याचा धक्कादायक प्रकार उरण मध्ये समोर आला आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, खुद्द नगराध्यक्षांनीच या प्रकरणाला वाचा फोडली आहे.
नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत "श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल" येथील ठेक्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, २०१३ पासून एका त्रयस्थ व्यक्तीला कोणतीही कल्पना न देता, त्याच्या नावाचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करून हे काम लाटण्यात आले. यामध्ये नवी मुंबईतील कंत्राटदार वासुदेव छगन पाटील यांच्या 'मे. वी.सी. पाटील इंटरप्रायजेस' या फर्मच्या नावाने बोगस पॅनकार्ड, रेशनकार्ड, आयकर विवरणपत्र आणि बनावट सह्यांचा वापर करुन टेंडर मिळवण्यात आले.
१ कोटींहून अधिकची थकबाकी:-
२०१५ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत क्रीडा संकुलातील विविध सुविधा चालवून नगरपरिषदेची तब्बल १ कोटी १ लाख ६३ हजार ४९८ रुपयांची थकबाकी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या वासुदेव पाटील यांच्या नावावर हे काम दाखवण्यात आले, त्यांनी "मी असे कोणतेही काम घेतलेले नाही," असे स्पष्ट करत आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
माहिती अधिकारातही दिशाभूल ?
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे ते म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागवलेल्या माहितीवरून. पत्रकारांनी यापूर्वी या ठेक्याबाबत माहिती मागवली असता, नगरपरिषदेकडून चुकीची आणि बोगस माहिती पुरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे हा घोटाळा जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न झाला का, असा संशय व्यक्त केला आहे.
सध्या उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव रजेवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पदभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. उरण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या महाघोटाळ्याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.उरण नगर परिषदेत अनेक वर्षांपासून विविध कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.उरण नगर परिषदेत अनेक घोटाळे, भ्रष्टाचार झाले असून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सर्व प्रकरणे बाहेर काढावीत अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.