मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, व्हिडिओमध्ये दिसणारे सर्वजण प्रौढ (१८ वर्षांवरील) असल्याचं दिसत आहे. त्यामुळे संबंधित महिलेची कोणतीही तक्रार नसेल, तर या प्रकरणावर राजकीय भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मात्र, जर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि कुणालाही सोडू नये, असा ठाम इशारा त्यांनी दिला.
यावेळी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली. तटकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर राहिल्याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावर पवारांनी पलटवार करत, अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आपण कर्नाटकात असल्याचे सांगितले.
तसेच, पक्षांतर्गत वाद हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट करत, काही आर्थिक बाबींवरही त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.दरम्यान, संबंधित अपघात प्रकरणात आपण कुटुंबीय म्हणून गुन्हा दाखल केल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास असल्याचेही रोहित पवार यांनी नमूद केले.