सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
  • दारूमुळे गावाचा समतोल बिघडला; दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार, लग्नांवरही परिणाम
  • भोंदू अशोक खरातांकडे जाणारे 'ते' 40 आमदार कोण? तो कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, सगळं बाहेर आलं पाहिजे, राऊतांची मागणी
 जिल्हा

अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

डिजिटल पुणे    28-03-2026 11:54:56

मुंबई : अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा. येथील नागरिकांना एकत्रित घेऊन, प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या मोठ्या घरात राहण्याचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.विक्रोळीतील कन्नमवार नगर, येथील मुंबई हाउसिंग फेडरेशन लि. संचालित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उद्घाटन व प्रतीक्षानगर, सायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री सह पालकमंत्री मुंबई उपनगर मंगल प्रभात लोढा, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, महापौर रितू तावडे, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, आमदार अमित साटम, माजी खासदार राहुल शेवाळे, म्हाडा प्राधिकरण उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी म्हाडा मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महेंद्र कल्याणकर, मुख्य अधिकारी इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ मिलिंद शंभरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असून, त्यातून प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रशासकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या भवनात आधुनिक कॉन्फरन्स हॉल, प्रशिक्षण कक्ष आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.राज्यात सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व असून, विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी शंभर टक्के डिजिटायझेशन, कार्यालयांचे विकेंद्रीकरण आणि विविध सुधारणा राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गृहनिर्माण सहकार क्षेत्राला नवी चालना

स्वयंपुनर्विकास धोरणामुळे मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळत असून, सध्या सुमारे १६०० हून अधिक प्रकल्प सुरू आहेत, तर अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या योजनांना वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आतापर्यंत २००० महिलांना स्वावलंबी बनविण्यात यश

‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी वित्तीय मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.आतापर्यंत २००० महिलांना स्वावलंबी बनविण्यात यश मिळाल्याचेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजना सुरू केल्याचे सांगितले.

राज्य सरकारने स्वयंपूर्ण विकासासाठी विविध सवलती व धोरणात्मक निर्णय घेतले असून, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. मुंबई बँकेने गिरणी व माथाडी कामगारांसाठी कर्जसुविधा, महिलांसाठी झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मोहीम आणि व्याजमुक्त कर्ज योजना राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सहकार भवन उभारणीमुळे आधुनिक सुविधा, कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी चळवळीला नवी दिशा मिळेल, असे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सहकार चळवळ परंपरेतून उभी राहिली असून, भविष्यातही महिलांना व तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती