मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आढावा बैठक झाली. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक व मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी जात नाहीत, त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा आणि सोयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रशासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषद पातळीवर समन्वय साधून जागा निश्चित करावी, तसेच एस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असेही मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी सांगितले.