सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
  • दारूमुळे गावाचा समतोल बिघडला; दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार, लग्नांवरही परिणाम
  • भोंदू अशोक खरातांकडे जाणारे 'ते' 40 आमदार कोण? तो कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, सगळं बाहेर आलं पाहिजे, राऊतांची मागणी
 जिल्हा

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगी स्वागत;गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाची केली घोषणा ; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा केला सन्मान

डिजिटल पुणे    30-03-2026 10:21:46

सावंतवाडी :  पत्रकारितेच्या विश्वाला नवे दिशा-दर्शन देणारे अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ४ मे २०२६ रोजी गोवा राज्यातील पणजी येथील कला अकादमी येथे भव्य-दिव्य वातावरणात पार पडणार असल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी सावंतवाडीत केली.अधिवेशनासाठी महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतून पत्रकार, संपादक आणि डिजिटल माध्यमातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हे अधिवेशन संघटनेच्या कार्याचा मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी संघटनेच्यावतीने राजा माने यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने जंगी स्वागत करण्यात आले.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सिताराम गावडे, कोकण विभाग अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, तालुका संघटक आनंद धोंड तसेच पदाधिकारी शुभम सावंत, श्रीरंग सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना राजा माने यांनी पत्रकारितेच्या संघर्षमय वास्तवावर भाष्य करताना सांगितले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून तो सदैव इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतो. मात्र स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देणे, आर्थिक स्थैर्य मिळवणे या बाबींकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकार बांधवांना संघटनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ, उद्योग क्षेत्रात संधी आणि मार्गदर्शन देणे ही संघटनेची प्राथमिक जबाबदारी आहे.

गोव्यात होणारे अधिवेशन हे केवळ कार्यक्रम नसून पत्रकार सक्षमीकरणाचा नवा अध्याय ठरेल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. राष्ट्रीय सचिव तेजस राऊत यांनी संघटनेच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकताना सांगितले की, आज संघटना देशातील अनेक राज्यांत विस्तारत असून शेकडो पत्रकार बांधव या व्यासपीठाशी जोडले जात आहेत. आगामी काळात संघटनेचे कार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व सदस्यांनी संघटनेच्या तत्त्वांचे पालन करून विधायक कार्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी राजा माने व तेजस राऊत यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या वतीने नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी सिताराम गावडे, रुपेश पाटील, राजेश नाईक, भरत केसरकर, सिद्धेश सावंत व आनंद धोंड यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी राज्य संघटक व ज्येष्ठ संपादक सिताराम गावडे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेतील अनुभव कथन करताना सांगितले की, पत्रकारितेचा प्रवास हा खडतर असून अनेक बदलांना सामोरे जावे लागते. चांगल्या कार्याला पाठबळ मिळते, मात्र चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले की पत्रकारांवर हल्ले होतात, ही बाब चिंताजनक आहे. तरीही आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून आदर्श कार्य घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तसेच राजेश नाईक, भरत केसरकर, सिद्धेश सावंत व आनंद धोंड यांनीही मनोगत व्यक्त करत संघटनेच्या कार्याला पाठिंबा दर्शविला. प्रास्ताविकात सागर चव्हाण यांनी आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांचा आढावा घेत डिजिटल पत्रकारांना मिळालेल्या न्यायाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. एकूणच या बैठकीतून आगामी राष्ट्रीय अधिवेशनाची भव्य तयारी आणि संघटनेच्या कार्याचा वाढता प्रभाव अधोरेखित झाला.


 Give Feedback



 जाहिराती