सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
  • अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स; देवेंद्र फडणवीसांना विचारताच एका वाक्यात विषय संपवून टाकला!
  • भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
 जिल्हा

गुन्हेगारीवर नियंत्रण आणणारा ‘कायद्याचा बालेकिल्ला- नाशिक जिल्हा’ पॅटर्न; पोलिस आयुक्तालय गटात नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात अव्वल

डिजिटल पुणे    30-03-2026 16:31:47

नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात ‘नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयास पोलिस आयुक्तालय गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नाशिक पोलिस आयुक्तालयाने या उपक्रमात संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅश बोर्ड, व्हॉटस ॲप, चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉक चेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले होते. कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली होती.

१५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात नाशिक पोलिस आयुक्तालयाने ई- गव्हर्नन्समध्ये शून्य प्रलंबितता धोरणाचा स्वीकार करीत अव्वल कामगिरी केली आहे. कायद्याचा बालेकिल्ला उपक्रमाच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण, ई ऑफिस, तक्रार निवारण व विविध निकषांद्वारे २०० पैकी १५६ गुण मिळवून नाशिक पोलिस आयुक्तालयाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहेत.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आयुक्तालयाने डिजिटल उपक्रम राबविले. पोलिस आणि नागरिकांमधील संवाद वाढावा म्हणून नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. त्यासाठी पोलिस आयुक्त आपल्या दारी, ई मीट वीथ सीपी, वॉक इन टूर, दर मंगळवारी विविध घटकांना पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाची माहिती देणे असे उपक्रम राबविले. यामुळे पोलिस दलाविषयी नागरिकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण झाली. तसेच पोलिस दलाने तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आली.

याबरोबरच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्ट्रीट क्राइम, महिला सुरक्षा, नागरिक केंद्रीत पोलिसिंगवर भर दिला. त्यांनी नागरिकांसाठी व्हॉटसॲप क्रमांक कार्यान्वित केला. त्यावर नागरिकांच्या विविध सूचना येतात. त्यांची तातडीने दखल घेण्यात येते. नाशिक पोलिस आयुक्तालय दैनंदिन कामकाजाबरोबरच आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करीत आहे. या कुंभमेळ्यासाठी सुमारे ३५ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. गोदावरी घाट परिसरासह नाशिक शहराची तीन स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली असून, कोअर एरिया, प्राथमिक व दुय्यम विभाग अशा स्वरूपात सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्वणीच्या दिवसांपूर्वीच ३६ तास अगोदर विशेष सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचे नियोजन पोलिस आयुक्त श्री. कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती