विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश): आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एक धक्कादायक खून प्रकरण समोर आले आहे. एका विवाहित नौदल कर्मचाऱ्याने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची कबुली देत स्वतःहून पोलीस ठाण्यात हजेरी लावली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिंताडा रवींद्र (वय 35) हा आयएनएस देगा येथे कार्यरत आहे. त्याने रविवारी आपल्या 29 वर्षीय प्रेयसीला घरी बोलावले होते. दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.घटनेच्या वेळी आरोपीची पत्नी माहेरी गेली होती. याच काळात त्याने प्रेयसीला घरी बोलावल्याचेही तपासात उघड झाले आहे.
नात्यातील वादातून टोकाचा निर्णय
दोघांची ओळख काही वर्षांपूर्वी एका डेटिंग ॲपद्वारे झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संबंध निर्माण झाले. मात्र पैशांच्या व्यवहारावरून आणि नातेसंबंध उघड करण्याच्या वादामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. याच कारणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्वतःहून कबुली, पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर आरोपी थेट पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घरातून काही पुरावे जप्त करण्यात आले असून, उर्वरित तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.या प्रकरणामुळे पुन्हा एकदा देशातील गाजलेल्या श्रद्धा वॉकर हत्याकांड ची आठवण ताजी झाली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू आहे.