पुणे: पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या सीआरपीएफ जवानाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, अपघातानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात झालेल्या विलंबामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रशांत प्रकाश कदम (वय ४२) हे २५ मार्च रोजी ड्युटीसाठी बाहेर पडले होते. ते गुजरातमधील गांधीनगर येथे कार्यरत होते. घरातून निघाल्यानंतर ते लोणावळा येथे गेले, त्यानंतर परत तळेगावच्या दिशेने आले असल्याची माहिती पुढे आली. याच दरम्यान त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांशी संपर्क तुटला.
त्याच दिवशी रात्री सोमाटणे फाटा परिसरात रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णवाहिकेद्वारे वायसीएम रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अनोळखी व्यक्तीचा मृत्यू अशी नोंद केली. दरम्यान, कदम बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती. मात्र, बेपत्ता व्यक्ती आणि सापडलेल्या मृतदेहाची नोंद एकाच पोलीस ठाण्यात असूनही त्यांचा परस्पर संबंध लावण्यात विलंब झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या माहितीतून एका रुग्णवाहिका चालकाने फोटो पाहून मृताची ओळख पटवली. त्यानंतरच कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. ३० मार्च रोजी नातेवाइकांनी रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला.
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिसांकडून तपासात झालेल्या कथित हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. सध्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.