सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळी पावसाने शेती उद्ध्वस्त, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  • अशोक खरातच्या लेकीची लग्नपत्रिका, एकनाथ शिंदे, चाकणकर, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलारांचं नाव!
 क्राईम

अशोक खरात प्रकरणाला वेग; रुपाली चाकणकर आज चौकशीला हजर राहणार का?

डिजिटल पुणे    31-03-2026 11:51:39

नाशिक :  नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून उद्या (१ एप्रिल) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस कोठडीचा शेवटचा दिवस असल्यामुळे तपास यंत्रणा आज दिवसभर अधिक पुरावे गोळा करण्यावर भर देत आहे.

एसआयटीकडून सोमवारी खरातच्या कार्यालयावर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय त्याच्या मोबाईलमधील डेटा पुनर्प्राप्त करून त्याच्या संपर्कातील व्यक्ती, चॅटिंग आणि संभाषणांचा तपशील तपासला जात आहे. या तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात चर्चेत असलेल्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल त्या चौकशीसाठी हजर राहणार असल्याची चर्चा होती; मात्र त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत चौकशी टाळल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आज त्या एसआयटीसमोर जबाब नोंदवण्यासाठी येणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

याच प्रकरणात शिवनिका संस्थानच्या विद्यमान आणि माजी विश्वस्तांचीही चौकशी होणार आहे. दरम्यान, या मुद्द्यावर विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, अशोक खरातविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्याच्यासह पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मूळ जमीनमालकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून संबंधित प्रकरणात काही आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे.तपास यंत्रणा आता खरातच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित बाबींची सखोल चौकशी करत असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती