नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आजच्या सुनावणीपूर्वी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची विनंती करण्यात आलेले अॅड. अजय मिसर यांनी ही केस चालवण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इतर महत्त्वाच्या आणि वेळखाऊ खटल्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे या प्रकरणाला पुरेसा वेळ देता येणार नाही, असे कारण देत त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे आता या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच न्यायालयात बाजू मांडणार आहेत.
दरम्यान, अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरोधात सतत नवीन तक्रारी समोर येत असल्याने एसआयटीकडून कोठडी वाढवण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
समोरासमोर चौकशीत नवे खुलासे
एसआयटीने अलीकडेच खरातची एका चार्टर्ड अकाउंटंट, मंदिरातील पुजारी आणि सराफ व्यावसायिकासोबत समोरासमोर चौकशी केली. या चौकशीत मौल्यवान रत्न आणि सोन्याच्या व्यवहारात फसवणुकीचे संकेत मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तसेच बँक कर्ज व्यवहार आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबतही तपास सुरू आहे.
शिर्डी जमीन प्रकरणात गुन्हा दाखल
शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर आणि इतर काही जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमीन खरेदीत फसवणूक आणि सावकारीसंदर्भात तक्रार दाखल झाली असून, या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. दरम्यान, काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, काही जण फरार असल्याची माहिती आहे.या सर्व प्रकरणांमुळे अशोक खरातच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.