पुणे : राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत या पावसाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, पुण्यात 2 एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल 130 वर्षांचा विक्रम मोडला आहे. एका दिवसात तब्बल 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एप्रिल महिन्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. याआधी 1896 साली 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
या अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी नुकसानही झाले. गंगाधाम चौक परिसरात एक मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली, सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.त्याचबरोबर एका दुर्दैवी घटनेत झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण अडकले होते, त्यापैकी दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, तर एका महिलेचा मृत्यू झाला.
पुणे शहरासोबतच ग्रामीण भागातही पावसाचा जोर पाहायला मिळाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती असून, या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे छत्री किंवा रेनकोट नसलेल्या नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली.एकूणच, एप्रिल महिन्यातील या अवकाळी पावसाने पुणेकरांना अनपेक्षित धक्का दिला असून, त्याचा परिणाम जनजीवन आणि वाहतुकीवर स्पष्टपणे जाणवला.