सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने अक्षरशः कहर माजवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह विजांचा कडकडाट झाला. या अनियमित पावसामुळे शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
साताऱ्यात गारपिटीचा मोठा फटका
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीने मोठे नुकसान केले. उंडाळे आणि मस्करवाडी परिसरात मोठ्या आकाराच्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांचे सोलर पॅनल्स फुटले. याशिवाय अनेक घरांचे नुकसान झाले असून वाहनांच्या काचांनाही तडे गेले आहेत. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त
ओंड गावातील एका शेतकऱ्याचे सहा एकरांवरील कलिंगड पीक पूर्णपणे नष्ट झाले. तर मस्करवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे गोठ्यांचे पत्रे उडून गेले, भिंती कोसळल्या आणि काही जनावरे जखमी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे.
धाराशिवमध्ये वीज कोसळून पशुधनाचा बळी
धाराशिव जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांत वीज कोसळून सात जनावरांचा मृत्यू झाला. तुळजापूर, कळंब आणि वाशी तालुक्यातील विविध गावांमध्ये ही घटना घडली असून पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान
सातारा जिल्ह्यात सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, मका, कलिंगड यांसह आंबा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण तालुक्यात परिस्थिती गंभीर आहे.
अहिल्यानगरमध्ये मोठ्या क्षेत्रावर परिणाम
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे १८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. पारनेर तालुक्यात गारपिटीमुळे कांदा, गहू आणि फळबागांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांचे आणि सौरऊर्जा प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे.
मदतीची मागणी जोरात
या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आधीच महागाई आणि इतर अडचणींनी त्रस्त असलेल्या बळीराजावर आता अस्मानी संकट कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.