नाशिक : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधातील प्रकरणात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. न्यायालयाने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिस कोठडी सुनावली असून, ८ एप्रिलपर्यंत सखोल चौकशीसाठी पोलिसांना मुदत देण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, २०२० ते २०२६ दरम्यान आरोपीने धार्मिक विधींचा आधार घेत एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. भविष्याबाबत भीती निर्माण करून तिला वारंवार कार्यालयात बोलावले जात होते. ‘मंत्र केलेले पाणी’ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच काळात पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने औषधे देऊन गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे. विरोध केल्यास कुटुंबावर अनिष्ट परिणाम होतील, अशा धमक्या देत तिला गप्प ठेवण्यात आले, असेही तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ठिकाणाहून काही विचित्र आणि संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये २२ रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे असलेली पट्टी, काळे भिंग आणि हिरवट द्रव असलेली बाटली यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर लोकांना फसवण्यासाठी किंवा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आर्थिक फसवणुकीचा अँगलही तपासात समोर येत आहे. पीडितांकडून घेतलेल्या कागदपत्रांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी झाला का, याचा शोध घेतला जात आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे एका कुटुंबाची जमीन कमी किमतीत मिळवण्यासाठी आरोपीने अंधश्रद्धेचा आधार घेत दबाव टाकल्याचा आरोप आहे. जमीन शापित असल्याची भीती दाखवून ती आपल्या पत्नीच्या नावे करून घेतल्याचे उघड झाले असून, याच जागेवर मंदिर उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आरोपीची पत्नी कल्पना खरात फरार असून तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तिचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.सध्या या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.