शिरूर : शिरूर कासार येथे राहणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याची तब्बल वर्षभरानंतर कारागृहातून सुटका झाली आहे. न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवल्यानंतर तो थेट आपल्या घरी पोहोचला. मात्र, घरी आल्यावर उध्वस्त झालेला संसार पाहून तो भावूक झाला.
गेल्या वर्षभरात माझं सर्व काही नष्ट झालं, कुटुंब रस्त्यावर आलं, घराचा छतही उरला नाही, अशी वेदनादायक प्रतिक्रिया भोसले यांनी व्यक्त केली. वनविभागाने अतिक्रमण कारवाईत त्यांचे घर पाडल्यामुळे कुटुंबाची मोठी हानी झाल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर भोसले म्हणाले की, “सत्याचा शेवटी विजय झाला. माझ्यावर लावलेले आरोप खोटे ठरले. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता आणि न्याय मिळाल्याबद्दल मी आभारी आहे.” त्यांनी पुढे असा आरोप केला की, काही लोकांनी मुद्दाम त्यांना लक्ष्य करून कुटुंबावर अन्याय केला.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
बीड जिल्ह्यातील एका मारहाण प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच शिरूर परिसरातील आणखी एका मारहाणीच्या प्रकरणात आणि वन्यजीवाशी संबंधित गुन्ह्यात त्यांचे नाव समोर आले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, कारागृहात असताना त्यांच्या राहत्या ठिकाणी वनविभागाने कारवाई करत बांधकाम पाडले होते. काही अज्ञात व्यक्तींनी त्या ठिकाणी आग लावल्याचाही प्रकार घडला होता.आता न्यायालयाने एका प्रकरणात निर्दोष मुक्तता दिली असून दुसऱ्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. सुटकेनंतर त्यांच्या प्रतिक्रिया आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.