पुणे : राज्यात उन्हाळ्याच्या काळात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी 30 ते 50 किमी वेगाने वाहणारे वारे यामुळे अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (4 एप्रिल) राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाची शक्यता कायम असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासही हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मका, भाजीपाला आणि आंबा पिकांना फटका बसला आहे. काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला होता.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 62 गावांतील सुमारे 954 शेतकरी बाधित झाले असून सुमारे 832 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, मका, ज्वारी, गहू, केळी, पपई आणि आंबा या पिकांना मोठा फटका बसला आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे.
वाशिममध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला, तर सोलापुरात अचानक बदललेल्या हवामानामुळे मुसळधार पाऊस पडला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गारपिटीमुळे मका, कांदा आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नियोजन कोलमडले असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके धोक्यात आली आहेत. फळबागांमधील फुलांची व फळांची गळती वाढल्याने बागायतदारांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.