पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका तरुणीच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. पतीने पत्नीचा खून करून तो अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव सारिका घोडके (२३) असून, तिचा पती शुभम घोडके (२९) याला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पती शुभम पत्नीवर वारंवार संशय घेत होता, ज्यामुळे त्यांच्या नात्यात सतत वाद होत होते.
२४ मार्च रोजी झालेल्या वादातून परिस्थिती चिघळली. रागाच्या भरात शुभमने पत्नीवर घरातील वस्तूंनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत सारिका गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेनंतर शुभमने पत्नीचा मृत्यू गॅलरीतून पडल्यामुळे झाल्याचा दावा केला. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप पाहून पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय आला. तांत्रिक तपास आणि चौकशीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी पुन्हा सखोल चौकशी केली.
चौकशीदरम्यान शुभमचे उत्तर समाधानकारक नसल्याने पोलिसांचा संशय अधिकच वाढला. अखेर पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, शेजाऱ्यांच्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याचेही उघड झाले आहे.सध्या बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास सुरू आहे.