नाशिक : नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी प्रगती केली असून तब्बल 160 GB डिजिटल पुरावे जमा करण्यात आले आहेत. या प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग मिळाला असून फॉरेन्सिक अहवाल विशेष तपास पथकाकडे (SIT) सादर करण्यात आला आहे.
तपासादरम्यान तीन 32GB पेनड्राइव्ह, एक 64GB OTG पेनड्राइव्ह आणि लॅपटॉपमधील डेटा जप्त करण्यात आला आहे. या सर्व डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली असून त्यातून महत्त्वाचे पुरावे समोर येत आहेत. या डेटामध्ये विविध फोल्डर्समध्ये संशयास्पद हालचालींची नोंद आढळली आहे.
पोलिसांनी प्रत्येक डिजिटल पुराव्याला A, B, C असे कोडवर्ड दिले आहेत. त्यापैकी ‘A’ वर्गात गंभीर स्वरूपाच्या अत्याचारांशी संबंधित पुरावे असल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातील हालचालींचा तपशीलही जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेतही महत्त्वाची घडामोड झाली असून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खरातला तिसऱ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान पीडितेला फसवून संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप सरकारी पक्षाकडून करण्यात आला.या प्रकरणातील डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यामुळे तपास अधिक मजबूत होत असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.