पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका आईने आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा जीव घेतल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आईला अटक केली असून तिचा साथीदार अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कुरुळी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात तिचा मुलगा अडथळा ठरत असल्याची भावना निर्माण झाली होती. 4 एप्रिलच्या रात्री उशिरा मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मृत मुलाचा देह आईने बीड जिल्ह्यातील माहेरी नेऊन हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. अंत्यविधीची तयारी सुरू असताना मुलाच्या आजोबांना संशय आला. त्यांनी परळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात संशय बळावला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
सदर महिला आणि तिच्या पतीचा विवाह सुमारे दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. काही वर्षांपूर्वी वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर ती पतीपासून वेगळी राहत होती. दरम्यान, पतीच्या ओळखीतील व्यक्तीसोबत तिचे संबंध जुळले होते.या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.